शाळा

गेल्या जानेवारी महिन्यात मी MIT च्या ‘ग्लोबल टीचिंग लॅब्ज़’ (Global Teaching Labs) तर्फे काझाखस्तानच्या तराज़ शहरात ‘नझरबायेव इंटरनॅशनल स्कूल’ मध्ये शिकवायला गेले होते. तिथे महिनाभर दमीरा ख़ामितोवना आशिरोवा (शाळेतल्या रसायनशास्त्राच्या शिक्षिका) यांच्या घरी राहत होते. ह्या महिन्यातल्या प्रत्येक संवादातून किंवा अनुभवातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं. त्या सर्व अनुभवांबद्दल मी काही लेख लिहीत आहे, त्यातला हा दुसरा – ‘शाळा’.


काझाखस्तान दौऱ्याचा मूळ हेतू तिथल्या शाळेत शिकवण्याचा होता. नक्की काय शिकवायचं? कुठे? कोणाला? कसं? हे सारे प्रश्न मला अगदी तराज़मध्ये १-२ आठवडे राहिल्यानंतरही पडत होते.

कुठे शिकवायचं?

सकाळचे ८:३० वाजता वाजता दमीरा ख़ामितोवना आणि मी घाईघाईत शाळेच्या इमारतीच्या पायऱ्या चढून आत शिरायचो. ‘नझरबायेव इंटेलेक्चुअल स्कूल’ (NIS) मध्ये प्रवेश केल्या केल्या काझाखस्तानी माजी राष्ट्रपती नूर-सुलतान नझरबायेव यांचा अर्धपुतळा मला पाहून जणू म्हणायचा, ‘केलास ना उशीर?’ नझरबायेव यांनी काझाखस्तानच्या पुढच्या पिढीला उत्तम शिक्षण देण्यासाठी स्थापन केलेल्या नामांकित NIS शाळांची ही एक शाखा. इथे शिकण्यासाठी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेद्वारे निवड होते. शिक्षणाचा खर्च सरकार करत असल्यामुळे मुलांची आर्थिक स्थिती काहीही असली तरी त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर ते इथे शिकू शकतात. प्रत्येक विद्यार्थी हुशार आणि जिद्दी असतो. पण शाळा ती शाळाच, कितीही नावाजलेली असो. प्रत्येक येण्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यानं ‘प्रिव्येत (Привет)’ किंवा ‘गुड मॉर्निंग’ म्हटल्यावर, किंवा मुलांनी आपापल्या गणवेशात केलेले छोटे-छोटे बदल बघितल्यावर, हॉस्टेलबाहेर मुलं एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकताना दिसल्यावर, मुख्याध्यापिकेने सर्वांना मोठ्या सभागृहात बोलावून लांबलचक भाषण दिल्यावर… NIS मध्ये मी जरी ‘शिक्षिका’ असले तरी विद्यार्थिनी होऊन पुन्हा शाळेत प्रवेश केल्यासारखं वाटायचं.

NIS शाळेचा परिसर

कोणाला आणि काय शिकवायचं?

माझे विषय होते जीवशास्त्र आणि भाषासास्त्र, आणि वर्ग होते ११वी आणि १२वी चे. ११वी-१२वी चे विद्यार्थी माझ्याहून फार लहान नव्हते. त्यामुळे वर्गाबाहेर सुद्धा घट्ट मैत्री झाली. अभ्यासातून वेळ काढून मुलं आम्हाला (माझ्यासोबत आणखी एक MIT चा विध्यार्थी होता) शाळेतल्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवायला घेऊन जात. हस्तकलेच्या वर्गात विणकामापासून कुंभारकामापर्यंत सर्व प्रकारचं साहित्य आणि उपकरणे बघितली, तसंच क्रीडा विभागात बास्केटबॉल कोर्ट सोबत पारंपरिक काझाख खेळ पण बघायला मिळाले. ह्यातला ‘तोगझ कुमालाक’ (тоғыз құмалақ) हा खेळ PT च्या सरांनी आम्हाला शिकवला आणि विद्यार्थ्यांनी त्यांनी दिलेल्या माहितीचं भाषांतर केलं.

जीवशास्त्र आणि भाषासास्त्र ह्या विषयांच्या पलिकडेही विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रकल्पांबद्दल किंवा कॉलेजच्या तयारीबद्दल मी त्यांच्याशी बोलायचे. मुलांच्या गच्च भरलेल्या दिनचर्येत कुठेतरी मला एखादा तास मिळायचा — बाकीच्या वेळात तीन भाषा, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र, संगीत, हस्तकला, खेळ, सैन्य प्रशिक्षण ह्याचा अभ्यास विद्यार्थी करत असत. कमी वेळ असल्यामुळे मला ठरवावं लागलं की मी नक्की ह्या विषयांतला कोणता भाग मुलांसमोर मांडू, ज्याने मुलं वर्ग संपल्यावर पुढे शिकू इच्छितील आणि स्वतः शिकूही शकतील?

कसं शिकवायचं?

पहिली गोष्ट म्हणजे तयारी. आठवड्यातले ६-१० तास आम्ही शिकवायचो, आणि ३० तास त्यासाठी तयारी करायचो- प्रत्येक धड्याचा विषय निवडणे, त्या विषयावर पुन्हा वाचन करणे, वर्गात चर्चेसाठी प्रश्नांची यादी करणे, माझ्या पुर्वीच्या परीक्षेतल्या प्रश्नोत्तरांना सोप्या भाषेत पुन्हा लिहीणे, इ. दुसरी गोष्ट म्हणजे वर्गात संवादाचे वातावरण निर्माण करणे. NIS मध्ये १०वी पर्यंत रुसी किंवा काझाख भाषेत धडे असतात आणि ११वीत अचानक इंग्रजीला सामोरं जावं लागतं, त्यामुळे इंग्रजीत शिकवणं जरा अवघड होतं. माझी भाषिक कमतरता शिक्षणाच्या मध्ये येऊ नये यासाठी माझा प्रयत्न होता की ‘लेक्चर’ सोडून मुलं वर्गात एकमेकांशी बोलावीत.

भाषाशास्त्राच्या तासात मात्र वर्गातल्या भाषिक वैविध्याचा मला उपयोग झाला. चर्चेच्या विषयांवर मुलं आपणहून उदाहरणं पुरवत होती- रुसी आणि उझबेक भाषेतली साम्य, किंवा तुर्की भाषेतली शब्दरचना, किंवा आणखी काही. मी वर्गात कधी रुसी किंवा काझाख भाषेतलं उदाहरण दिलं की मला वर्गातलं वातावरण हलकं झाल्यासारखं जाणवायचं, कारण ही उदाहरणं विद्यार्थ्यांना ओळखीची होती आणि त्यांनाही कदाचित जाणवलं असावं की मी त्यांना शिकवण्याचा विषेश प्रयत्न करत आहे.

तर काझाखस्तान मध्ये शिकवताना मी काही शिकले का? नक्कीच- शिकवण्याची प्रक्रिया आणि शैक्षणिक पद्धती ह्या दोन्हींबद्दल. आणि काझाखस्तान मध्ये मी काही शिकवलं का? ह्याचं उत्तर विद्यार्थीच देऊ शकतील.


Leave a Comment

Username (required)
Comment (Markdown allowed)
Comments will appear after moderation.