चाय
by Rujul, 21 Apr 2020गेल्या जानेवारी महिन्यात मी MIT च्या ‘ग्लोबल टीचिंग लॅब्ज़’ (Global Teaching Labs) तर्फे काझाखस्तानच्या तराज़ शहरात ‘नझरबायेव इंटरनॅशनल स्कूल’ मध्ये शिकवायला गेले होते. तिथे महिनाभर दमीरा ख़ामितोवना आशिरोवा (शाळेतल्या रसायनशास्त्राच्या शिक्षिका) यांच्या घरी राहत होते. ह्या महिन्यातल्या प्रत्येक संवादातून किंवा अनुभवातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं. त्या सर्व अनुभवांबद्दल मी काही लेख लिहीत आहे, त्यातला हा पहिला – ‘चाय’.
‘चाय’ (чай) म्हणजे रुसी भाषेत चहा. काझाखस्तानात असं लक्षात आलं की कदाचित लोकं पाण्यापेक्षा जास्त चहाच पीत असावीत. नाश्ता असो वा जेवण, “चाय?” हा प्रश्न विचारला जाणार हे नक्की.
काझाखस्तानला जाण्यापूर्वी मला चहा ह्या प्रकारात विशेष रुची नव्हती. ‘चहा’ म्हटलं की तुमच्या आणि माझ्या मनात साधारण एकच कल्पना येते. अर्थात, प्रत्येक चहाच्या कपात बनवणाऱ्याची खासियत, कधी आलं तर कधी वेलदोडा, एक वेगळा स्वाद उतरतोच. पण आपण एकसारखीच पद्धत शिकत आलो असतो: चहाची पानं, साखर, दूध… तराज़ मध्ये मात्र ‘चाय’ चे अनेक रंग अनुभवायला मिळाले. पुदिन्याचा स्वाद असलेला, काढ्यासारखा लागणारा ‘मोरक्कन’ (Moroccan) चहा, बारीक गोडसर रानफळांचा गुलाबी चहा, किंवा ‘इस्तंबुल कॅफे’ मधला उंच कपातला कडक तुर्की चहा.
शाळेच्या कॅन्टीनमधला चाय म्हणजे सामोवारासारख्या भांड्यातून गरम पाणी आपापलं भरून घ्यायचं, आणि टी बॅग वापरून चहा बनवून घ्यायचा. पण घरी अशी पद्धत नव्हती. जितकी घरं मी पाहिली, त्या सर्व घरांत गॅस वर कायम एक चहाची किटली असायची, ज्यात दिवसातून २-३दा चहा बनवला जायचा. चहा कपातून किंवा छोट्या वाटीतून दिला जायचा. चहाची कप-बशी आपल्या ओळखीची आहे, पण काझाख शैलीची तळहातात मावणारी, नाजूक वाटी माझ्यासाठी नवीन होती. इथे असं म्हणतात की वाटीत चहा भरताना जितका कमी भराल, तितका पाहुण्याचा आदर जास्त. याचं कारण असं की वाटी कमी भरल्यावर ती पुन्हा-पुन्हा भरून देता येते. पुन्हा-पुन्हा चहा भरून देणे हे नक्कीच आढळलं, पण वाटी पूर्ण न भरण्याची प्रथा मी एकदाच अनुभवली, दमीरा ख़ामितोवनांच्या गावी गेल्यावर.
तराज़वरून तासाभराच्या अंतरावर त्यांचं गाव आहे, ज्याला त्या ‘दूंगानाफ़का’ म्हणतात. त्यांनी सांगितलं की अनेक वर्षांपूर्वी अरबी माणसांनी धर्मप्रसारासाठी चीन मधल्या मुलींशी लग्न करून तिथे आपली घरं बसवली. त्यांचे वंशज म्हणजे आजचा दूंगान समाज, ज्यांच्यापैकी काही काझाखस्तानात राहतात.
दूंगानाफ़का येथे आम्ही प्रथम दमीरा खामितोवनांच्या सासरी गेलो. तिथे दमीरा ख़ामितोवनांचे दीर आणि त्यांची मुलं व नातवंडं अशा सर्वजणांनी घर गजबजलं होतं. माझ्या लहानपणी उन्हाळ्यात आमचा कुटुंब-परिवार नाशिकला मामाकडे जमायचा, तेव्हा ते घर असंच भरून जात असावं. पण ह्या घरात किती लहान मुलं होती! काझाखस्तानची लोकसंख्या कमी आहे, पण एखाद्या जोडप्याला ३-४ मुलं असणं सर्वसाधारण आहे. जेवायला आम्ही सर्वजण ज्या खोलीत गेलो, तिथे पंगतीचं नियोजन केलं होतं: खोलीच्या मधोमध एक लांब, बुटकं टेबल होतं आणि त्या टेबलाच्या दोन्ही बाजूंना बसायला सतरंजी होती. टेबलावर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची ताटं मांडली होते. त्याशिवाय फळं होती, पक्वान्नांमध्ये अगदी चॉकलेट सुद्धा होतं—आणि अर्थात, ‘चाय’. तिथे जेवण झाल्यावर दमीरा ख़ामितोवनांच्या बहिणीकडे गेलो, जिथे रात्री ९ वाजता सुद्धा चहा-बिस्किटांच्या जोडीने गप्पा रंगल्या.
‘चाय’ ची आठवण ही माझ्यासाठी लोकांच्या आठवणींशी घट्ट जुळली आहे. संध्याकाळचं जेवण झालं की मी, दमीरा ख़ामितोवना, आणि त्यांचा मुलगा रामज़ाल्दीन (उर्फ राम) त्यांच्या लहानशा स्वयंपाकघरात चहा पीत बसायचो. बऱ्याचदा माझा रुसी भाषा शिकण्याचा प्रयत्न सुरु व्हायचा, आणि थोड्याच वेळात आपल्या भाषेची वैशिष्ट्ये सापडत-सापडत राम आणिॆ त्यांच्यातच भरभरून रुसी भाषेत संवाद सुरु व्हायचा. एकदा दमीरा ख़ामितोवना मला ‘पळणे’ यासाठीचे रुसी शब्द शिकवत होत्या. एकाच क्रियापदाला वेगवेगळे उपसर्ग जोडले की वेगवेगळ्या अर्थांचे शब्द तयार होतात: बाहेरून आत येणे, आतून बाहेर जाणे, पळून जाणे, काहीतरी सांगण्यासाठी पळत येणे, इ. राम, जो फारसं इंग्रजी बोलत नाही, प्रत्येक क्रियेचं प्रात्यक्षिक दाखवत होता. आणि असे सगळे प्रयत्न चालू असताना मी भाषा शिकण्याचा उत्सुकतेने, चाय पीत, “दा, दा,” (हो, हो) म्हणत माझ्या माहितीतल्या एकमेव शब्दाने या गमतीला दाद देत होते.
‘चाय’ ची आता गोडी लागली आहे, कारण जेव्हा कधी मी चहाचा गरम कप हातात घेऊन शांत बसते, तेव्हा काझाखस्तानमधल्या थंडीची, लोकांच्या प्रेमाची, एका रहस्यमय भाषेची, आणि प्रत्येक संवादाची आठवण येते. एक ‘चाय’ ची नदी जणू काझाखस्तानच्या बंगल्यांमधून आणि छोट्या फ्लॅट्समधून, आजी-आजोबांपासून लहान मुलांपर्यंत सर्व लोकांमधून, काझाख बोलीतून आणि रुसी शब्दांमधून वाहत चालली आहे. ह्या एका महिन्यात त्याचा एक छोटा घोट तरी मी माझ्या वाटीत भरू शकले.
Leave a Comment